Monday 30 January 2017

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मावळत्या संमेलनाध्यक्षाचे आत्मकथन साहित्य संमेलनात वाचायला मिळणार !

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष श्रीपाल सबनीस आपल्या पदाची सूत्रे डोंबिवलीत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्याकडे सोपवतील. त्याचवेळी संमेलनाला जमलेल्या रसिकांच्या हातात सबनीस यांची आत्मकथाही असेल. अर्थात हे पुस्तक त्यांचं आत्मचरित्र किंवा चरित्र नसेल तर साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना कुठले अनुभव आले याचा लेखाजोखा या पुस्तकात असेल.
पुण्यातील ‘चेतक बुक्स’ या संस्थेच्या वतीने ‘संमेलनाध्यक्षाची आत्मकथा’ हे पुस्तक डोंबिवली इथं होणार्‍या 90 व्या संमेलनात प्रकाशित होत आहे. पिंपरीत झालेल्या व पी. डी. पाटील स्वागताध्यक्ष असलेल्या 89 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस होते. सबनीस यांचं नाव ते संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहिल्यापासूनच गाजायला लागलं. ते अध्यक्ष झाल्यावर तर त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी ते वर्षभर चर्चेत राहिले. सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर तर सबनीस यांची चर्चा सगळीकडेच झाली. त्यांना पोलीस संरक्षणही पुरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यानं तर संमेलनासमोरच प्रश्‍नचिन्ह उभं राहिलं. देशभर हा वाद गाजला. पुढे हा वाद मिटला, पण त्यानंतरही अनेक वाद झाले. सबनीस यांनी धैर्याने अनेक वादांना तोंड दिले. आपली भूमिका नेटानं मांडली.
संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी राज्यातच नाही तर राज्याबाहेरही प्रवास केला. अनेक व्याख्याने दिली. या 14 महिन्यांच्या कालखंडाचा प्रवास त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. काही वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवरील काही मंडळींनी त्यांना अकारण टीकेचं लक्ष्य केलं होतं. त्याचा त्यांना कसा त्रास झाला त्याबद्दल त्यांची बाजू काय या सगळ्याचा उलगडा या पुस्तकातून होणार आहे.
यापूर्वी काही साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपले अनुभव सांगितले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष पदावरचे अनुभव सांगणारी स्वतंत्रच पुस्तके लिहिली आहेत. अन्य मान्यवरांनीही आपले अनुभव सांगितले आहेत. मात्र सबनीस आपल्या पदाची सूत्रे दुसर्‍याकडे सोपवतानाच म्हणजे अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवतानाच आपला प्रवास सांगत आहेत. यात त्यांनी त्यांच्यावर अन्याय करणार्‍या मंडळींवर सडेतोड लिहिले आहे.
साहित्य महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्ष माधवी वैद्य आणि अन्य पदाधिकारी तसेच साहित्यक्षेत्रातील काही मंडळींच्या वागणुकीचाही त्यांनी समाचार घेतला आहे. हे पुस्तक अनेक बाबींवर वेगळा प्रकाश टाकणारे ठरेल

No comments:

Post a Comment

नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती

 नीतिशास्त्र, सत्यनिष्ठा आणि अभिवृत्ती  UPDATED ON 10 JAN 2023